सातारा शहर ऐतिहासीक शहर आहे. या परिसारातील अनेक घटक हे आपले वेगळेपण राखून आहेत. ते सर्वच सातारचे मानबिंदू आहेत. यातील काहींनी आपल्या अस्तित्वाने सातारचे नाव उंचावले आहे, देशभर केले आहे अशाच काहींची अल्प प्रमणात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे....

1) बोगदा  2) पोवईनाका 3) बॉम्बे रेस्टॉरंट 4) अर्कशाळा 5) स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 6) नगर वाचनालय सातारा
7) सातारा आकाशवाणी  8) महानुभव मठ 9) सातारा एस. टी. स्टॅण्ड 10) सैनिक स्कूल, सातारा  11) शाहुकला मंदिर 12. दैनिक ऐक्य 13. टीसीपीसी
           
बोगदा
 
स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिशांनी खोदलेला जिल्ह्याच्या दक्षिणेकडील बोगदा हा सातारचा एक मानबिंदू ठरतो. या बोगद्यामूळे सातारा शहराशी दक्षिणेकडील आनेक गावे जोडली गेली आहेत. खंबाटकी बोगद्यापासुन अगदी बेंगरोल पर्यंत बोगदा असेल तर तो फक्त साता-यामध्येच. कॅप्टन पी. एल. हार्टच्या मार्गदर्शनाखाली 1855 मध्ये खोदला आहे. हा बोगदा बांधकाम क्षेत्रामधील एक अतुलनीय असे उदाहरण देता येईल. बोगद्याच्या प्रवेशव्दारावर हा बोगदा 1855 साली पूर्ण झाल्याची आणि त्यास रु.29,000.00 खर्च आल्याची नोंद आहे. जवळजवळ 155 वर्षे हा बोगदा सातारच्या सेवेसाठी उभा आहे आणि पुढे असणार आहे.
 
पोवईनाका
 
´पोवई नाका ´ अथवा ´पवई नाका ´ सातारची शान, मान होती, आहे अन राहणार आहे. सातारची सीमा कधीकाळी येथेच संपत होती. सातारचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ´पोवई नाका ´ द्र्ढ होत आहे. पोवई नाका म्हणून ओळख असणा-या ठिकाणावर पूर्वी पाणपोई आणि नगरपालिकेचा जकात नाका होता. पोवई नाक्यावर जेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. तेथे पेट्रोलपंप होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय झाल्यानंतर हे सर्व येथून हटविण्यात आले. आता मात्र हाच पुतळा संपूर्ण महाराष्ट्रासाठी शान बनला आहे. याच्या बाजूलाच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब तथा किसन वीर यांचा पुतळा आहे. सातारची सीमा संपत होती तेथूनच आता सातारा प्रवेश बनला आहे. बाजारपेठ, बॅंका, लॉज, शैक्षणिक आदी बाबींमुळे पोवई नाका प्रत्येकाच्या तोंडावर कायम आहे.
 
बॉम्बे रेस्टॉरंट
 
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक हॉटेल्स आहेत. सातारा पासून 1-2 कि.मी. अंतरावर पश्चिमेकडील बाजूस बॉम्बे रेस्टॉरंट होते. आता या ठिकाणी भव्य व्यावसायिक ईमारत उभी आहे. आज बॉम्बे रेस्टॉरेट नसले तरी ते नाव जणु काही अमर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग या परिसरात येतो. तसेच सातारा जिल्ह्यात महामार्गाव्दारे प्रवेश करणे सोपे पडते. बहुतांशी सरकारी कार्यालये या परिसराच्या आसपास असल्याने या परिसरास महत्त्व आहे. हा परिसर खेड भागात मोडत असला तरी सातारचा एक महत्त्वाचा हिस्सा ठरतो.
 
 
अर्कशाळा
 
वैद्यकशास्त्रामध्ये आर्युवेदास फार महत्त्व आहे. सातारा आर्युवेदामध्ये अग्रसेर आहे. कै. डॉ. एन. एम. आगाशे यांनी 1926 मध्ये आर्युवेदीक औषधे तयार करणारी आर्युवेद अर्कशाळा म. कंपनी सुरु केली. ही कंपनी पुढे सातारची अर्कशाळा म्हणून ओळख झाली. अर्कशाळेतील उत्पादने ही आर्युवेदाचार्य कै. श्री. वेणीमाधव शास्त्री जोशी, श्री. जी. ए. फडके, श्री. डी. व्ही. बोडस आदींच्या संशोधन, अनुभव आणि अभ्यासाचा परिपाक आहेत. गेल्या 50 वर्षांपासून अर्कशाळेतील उत्पादने डॉक्टरांक़डून रुग्णांसाठी सेवन करण्यास सांगितली जाताहेत. अर्कशाळेतील उत्पादनांवर रुग्ण आणि डॉक्टर्स यांचा दॄढ विश्वास आहे. सध्या अर्कशाळा 100हून अधिक उत्पादने करीत आहे. अर्कशाळेतील उत्पादने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
 
 
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय
 

साता-यातील सर्वसामान्य, गरीब रुग्णांना अक्षरशः देवदूत ठरलेले रुग्णालय कोणते असेल तर ते स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय होय. या रुग्णालयाचे जनमानसात सिव्हील असे नामकरण प्रचलित आहे. रुग्णालयामध्ये आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अपघात व आपतकालीन विभाग, प्रसुती विभाग, अतिदक्षता विभाग, परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा क्षयरोग केंद्र, कर्मचारी निवासस्थाने, ए.आर.टी. विभाग, रेडीओडायग्नोस्टिक, रक्तपेढी, आयुष विभाग, प्रयोगशाळा विभाग, जिल्हा प्रशिक्षण केंद्र इ. सुविधा आहेत. रुग्णांना तसेच त्यांच्याबरोबर असणा-या नातेवाईकांना अतिशय कमी दरात जेवण दिले जाते. हे रुग्णालय सातारा जिल्ह्याला कायमच आपलेसे वाटत राहिले आहे. सातारला याचा अभिमान वाटत आहे, वाटत राहणार आहे.

 
 
नगर वाचनालय सातारा
 
सातारकरांना नगर वाचनालयचा अभिमान आहे. नगर वाचनालयला सातारच्या इतिहासात मोठे स्थान आहे. नगर वाचनालय हे 1853 च्या आसपास अस्तित्वात आले. सर्व वाचकांसाठी एक समान फी हे या वाचनालयाचे वैशिष्ठ आहे. सातारा जिल्ह्यातील वाचकांना, अभ्यासकांना नगर वाचनालय हे अतिशय उपयोगी ठरले आहे. महाराष्ट्र शासनाने या नगर वाचनालयास अ दर्जा दिलेला आहे. 2000 हून अधिक सभासद असलेले हे वाचनालय आधुनिक असून ते संगणकचा वापर, स्क्रिनटची पुस्तके शोधण्यासाठी वापर करते. या वाचनालयात जवळजवळ 95,000 मराठी, इंग्लिश, हिंदी संस्क्रूतमधून पुस्तके आहेत. 27 दैनिके, 28 मासिके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. दैनिके आणि मासिक वाचन विभाग मोफत आहे. तर पुस्तकांसाठी अत्यल्प फी आहे. सातारकर वाचकांसाठी हे वाचनालय म्हणजे हक्काचे विद्यामंदीर आहे. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कलाकार, वयस्कर तसेच तरुण वाचक वर्गाला हे वाचनालय नेहमीच खुणावत राहीले आहे. जवळजवळ 160 वर्षे हे वाचनालय सातारकरांची ज्ञानलालसा पूर्ण करीत आले करीत राहील, यामुळे ते सातारमधील एक महत्त्वाचा मानबिंदू ठरले आहे.
 
सातारा आकाशवाणी
 
आजकाल केबल, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात आकाशवाणी कोण ऐकतो. असे जर मत असेल तर हे चुकीचे आहे असे सातारा आकाशवाणीने सिद्ध केले आहे. आकाशवाणीचे दर्जेदार कार्यक्रम आजच्या काळात लोकप्रियता राखून आहेत. सातारा आकाशवाणी सातारामध्ये 1992 साली सातारकरांच्या करमणुकीसाठी रुजू झाली. तेव्हापासून आजपर्यंत आकाशवाणीने सातारकरांच्या केवळ मनोरंजनातच नव्हेतर ज्ञानातही भर घालण्याचे काम केले आहे. फक्त खेडयापाड्यातच नव्हेतर शहरामध्येदेखील न चुकता आकाशवाणीचे कार्यक्रम आवडीने ऐकले जातात. किंबहूना सातारा आकाशवाणी तमाम सातारा जिल्ह्यातील लोकांचे सर्वात आवडते साधन आहे. आजही सातारा शहरातील तसेच जिल्ह्यातील काही भाग आर्थिकद्रुष्ट्या मागास आहे. त्यांना सातारा आकाशवाणी केवळ हेच ज्ञानाचे, मनोरंजनाचे माध्यम आहे जे त्यांना परवडते. सातारा आकाशवाणी केवळ मनोरंजन करत नाही तर शेतकरी, युवावर्ग, महिला, वयस्कर, चिमुकले आदी सर्व स्तरातील लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करीत असते. के-इं-मो. च्या गराड्यात अडकलेले के-इं-मो. ला कंटाळून परत आकाशवाणीकडे वळत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे सातारा आकशवाणीने जपलेले वेगळेपण होय. सातारा आकाशवाणी सातारची एक ओळख ठरते.

 

महानुभव मठ
 
महानुभव मठ सातारच्या ह्रदयामध्ये स्थित आहे. हा आश्रम महानुभव पंथाच्या पी. पी. पी. एम. एम. मोतीवाले बाबाजी यांनी तत्वज्ञानाचा उपदेश करण्याच्या हेतूने सन 1912 मध्ये स्थापन केला. हा आश्रम जातीय एकोपा, स्त्री समानता, जातीयवाद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि एकेश्वरवाद आदींचा प्रचार करतो. या मठाचे धेध्य देव पाहण्यासाठी डोळे देणे हे आहे. सातारा शहरामध्ये हा मठ सातारचे भाग्य मानावे लागेल. गेली 100 वर्षांपासून जास्त काळ हा मठ सातारामध्ये आहे.
 
सातारा एस. टी. स्टॅण्ड

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात आचरणात आणत असलेले सातारा एस. टी. स्टॅण्ड सातारचा एक मानबिंदू ठरतो. महाराष्ट्रातील एक नंबरचे एस.टी. स्टॅण्ड म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एस.टी. स्टॅण्डला आवश्यक असणारा विस्तीर्ण भूभाग, नियोजनपूर्ण रचना, प्रवाशांना मिळणारी सेवा, सातारा शहराच्या मध्यभागी अशा सर्वच बाजूने सातारा विभाग सातारा बसस्थानक उजवे ठरते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सातारामधून एस.टी. नियमीत वेळेत धावते. आधुनिकतेचा स्विकार करीत प्रवाशांसाठी विविध योजना अस्तित्वात आहेत. त्यामध्ये काही रकमेत महाराष्ट्रात आवडेल तिथे प्रवास, विना वाहक, ऑनलाईन रिजर्व्हरेशन, कर्मचारी वर्गाची विनम्र सेवा ही सातारा आगाराची वैशिष्ट्ये.

     
 
सैनिक स्कूल, सातारा
 

सातारा शहर देशात येथील सैनिक स्कूलमुळे ओळखले जाते. सशस्त्र सैन्यामध्ये समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील युवकांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीकरीता शैक्षणिक, बौद्धिक आणि शारिरकदृष्ट्या तयार करणे या दूरदृष्टीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने सातारा सारख्या ऐतिहासिक जिल्ह्यात 23 जुन 1961 रोजी देशातील 24 अशा सैनिक शाळा श्रृंखला पैकी पहिली सैनिक शाळा स्थापन झाली. या शाळेचे उद्घाटन भारताचे संरक्षण मंत्री कै. व्ही. के. कृष्ण मेनन यांनी केले होते.  येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.

     

 

श्री शाहुकला मंदिर
 

सातारा शहराची सांस्कृतीक ओळख म्हणजे सातारा नगर वाचनालय आणि श्री शाहु कलामंदीर अशी देता येते. साता-यातील अनेक सांस्कृतीक कार्यक्रम शाहु कलामंदीर येथे होत असतात. या मंदिराने महाराष्ट्रभर गाजलेल्या अनेक नाट्यप्रयोगांचा श्रीगणेशा पाहिला आहे. नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गज कलावंताच्या कलेचा आस्वाद या कलामंदीराने सातारकरांना दिला आहे. आधुनिक काळातही शाहु कलामंदीरने सातारा शहारातील रसिक जागृत ठेवला आहे. श्री शाहु कलामंदीर हे ख-या अर्थाने कलेचे मंदीर आहे आणि ते रसिक सातारकरांच्या मनात पुजले जात आहे जात राहणार आहे.

     
दैनिक ऐक्य
दैनिक ऐक्य 1924 रोजी सुरु झाला. प्रसिद्ध लेखक माधव गडकरी, डॉ. विश्वास मेहंदळे, ह. म. मराठे या वृत्तपत्रशी संलग्न आहेत. सातारा मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ऐक्य वर्तमान आहे. वर्तमानपत्रातील स्थानिक वार्तांकन सातारकरांना आकर्षित करते. 1999 साली दैनिक ऐक्यची वेबसाईट चालू झाली आणि मराठीतील पहिले वर्तमानपत्र इंटरनेट पाहण्याचा मान दैनिक ऐक्यला मिळाला.

 

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र
सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे संचालित माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र करंजे नाका सातारा येथे आहे. यामध्ये सागवानी प्लायवूड फर्ऩिचर, केबीन्स, काउंटर्स व इतर साहित्य, ,एम.एस. स्टील फर्निचर, रॅक्स, कपाटे, गाद्या, उशा, सोलापूरी चादरी, बेडशीट, मच्छरदानी, सतरंजी आदी वस्तूंचे उत्पादन केले जाते. माजी सैनिकांना हे केंद्र फार उपयुक्त आहे. याबरोबर महाराष्ट्रातील सर्व युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीस दलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे याकरीता मेस्को करियर अॅकॅडमी निवासासह सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ संचलित कारगिल ऑफसेट प्रिंटीग प्रेस (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) आहे. तसेच महासैनिक भवन (मल्टिपर्पज हॉल) हा सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त असा भव्य हॉल असून यामध्ये आजी-माजी सैनिक, सैनिक विधवा, महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी यांना भाड्यात सवलत देण्यात येते.
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या ---