सातारा शहरामध्ये अनेक देवालये आहेत. त्यातील काहींवर सातारकरांची फार श्रद्धा आहे. ही सातारची श्रद्धास्थाने सातारामध्ये प्रसिद्ध आहेत, यातील काही श्रद्धास्थानांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

 

सातारा शहाराच्या मोती चौक परिसरातील श्री पंचमुखी गणपतीचे मंदिर माघ शुद्ध चतुर्थी शके 1898, 26 जानेवारी 1977 रोजी स्थापन झाले. पंचमुखी गणेशाचे हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मानावे लागेल. संपूर्ण संगमरवरातील गणेशाची पंचमुखी मुर्ती भक्तांचे श्रद्धास्थान ठरली आहे. प्रत्येक चतुर्थीला सातारकर मोठ्या संख्येने या गणेशाचे दशर्न घेतात. मंदिरा ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 24 तास 12 महीने चालू असणारी पाणपोई आहे. तिचे पाणी स्वच्छ आणि मधूर आहे. अनेकजण या पाणपोईचा लाभ घेतात आणि पाणी पिवून तृप्त झालेले मन गणेशाचरणी नतमस्तक होतेच. या रस्त्यावरुन जाणारा प्रत्येक सातारकर तो कितीही घाईत असला तरी क्षणभर का होईना-दूरुनतरी गणेशाला वंदन करुनच पुढे जातो.

 
पंचमुखी गणेशाच्या उजव्याबाजूला श्री उत्तराभीमुखी मारुतीचे मंदिर आहे. हे मंदिर आनंदीबाई घाटे ट्रस्टचे आहे. श्री गणरायाचे दर्शन घेउन भाविक मारुतीरायाचे दर्शन चुकवीत नाही. सदरचे मूळचे मंदीर दगडी बांधकामातील प्राचीन स्वरुपाचे आहे. मंदिर खाजगी स्वरुपाचे असलेतरी भाविकांसाठी ते अडसर ठरत नाही. श्रीगणेश आणि हनुमान यांचे शेजारी-शेजारी असणारे मंदीर सातारकरांचे श्रद्धास्थान आहे.
 
न्यु इंग्लिश स्कुल, साताराच्या पाठीमागे फुटका तलाव आहे. या तलावामध्ये श्रीगणेशाचे सुंदर मंदिर आहे. तळ्याच्या बरोबर मध्यभागी हे मंदिर आहे. चतुर्थी, गणेशोस्तव काळात मोठ्या संख्येने सातारकर दर्शनासाठी येतात. फुटका तलाव मंदिर ट्रस्टमार्फत गणेश उत्सव काळात सादर केले जाणारे देखावे पाहण्यासारखे असतात. ते पाहण्यासाठी सातारकरच नव्हेतर इतर भागातूनही लोक गर्दी करतात.
 

चिमणपुरा पेठ, सातारा येथील श्री गारेचा गणपतीमंदिर आहे. श्रींची मुर्ती सुरेख आहे. मंदीराच्या आतील खांबांवर अष्टविनायकाच्या छोट्या मुर्ती आहेत.

 
प्रतापगंज पेठेमध्ये श्री गोराराम मंदीर हे खाजगी स्वरुपाचे आहे. सदरचे मंदीर पुरातन असून त्याचे आतील सुरेख बांधकाम लाकडामधील आहे. रामनवमीच्या दिवशी सातारकर मोठ्या संख्येने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येतात. बदलत्या काळातही हे मंदीर आपले वेगळेपण राखून आहे.
 
राजवाडा परिसरामध्ये लोकप्रिय कै. सोमण स्मारकापाठीमागे श्री स्वयंभू वीर मारुतीचे मंदीर आहे. दररोज विशेषतः दर शनिवारी मोठ्या संख्येने मारुतीचे दर्शन घेतात. मंदीराची रचना थोडी पुरातन असलीतरी मंदीरात पाउल टाकताच मन प्रसन्न होते. सुंदर वीर मारुती मुर्ती पुर्वेकडे आहे.
 
यादोगोपाळ येथे श्री गोल मारुती मंदीर आहे. या मंदीराचा आकार गोल आहे. त्यामुळे या मारुतीस गोल मारुती नाव पडले असावे. श्री मारुती मूर्ती पुर्वाभिमुखी असली तरी ती उत्तराभिमुखी प्रतीष्ठापली आहे. हा परिसरदेखील गोल मारुती म्हणून ओळखला जातो.
 
प्रतापगंज पेठ येथे श्री प्रताप मारुती मंदीर आहे. सदरचे मंदीराचे नुतनीकरण झाले. श्री मारुती मुर्ती लहान असली तरी पावणारी आहे अशी श्रद्धा आहे. मंदीरामध्ये मोफत वाचनालय आहे. त्याचा फायदा अनेक सातारकर घेत असतात.
 
शनिवार पेठ सातारा येथे श्री शनि मारुतीचे भव्य मंदीर आहे. सध्या या मंदीराचे फार छान नुतनीकरण करण्यात आले. दर शनिवारी मोठ्या संख्येने शनि मारुतीच्या दर्शनाकरीता सकाळपासून सातारकर येत असतात. शनिदेव आणि मारुती नवसाला पावणारे आहेत अशी श्रद्धा आहे. शनि अमावस्या तसेच इतर महत्वाच्या सणांना दर्शनासाठी गर्दी असते.
 
साताराच्या पुर्वेकडे गोडोली भागामध्ये श्री साईबाबा मंदीर आहे. सदरचे मंदीराची हे 25 एप्रिल 1985 रोजी श्री साई चरणाचा दास राम (स्वामी राम बाबा) मुंबई यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी राजामाता सुमित्राराजे भोसले या अध्यक्ष होत्या आणि मंदीराचे संकल्पक श्री पां.शं. भुजबळ उर्फ साईरंग महाराज होते. 29.9.1990 मध्ये मंदीराचे शेजारीच गणेशाई मोफत वाचनालय सुरु करण्यात आले आहे. तसेच सातारा ते शिर्डी पायी पालखी सोहळा दरवर्षी आयोजीत केला जातो. सातारा शहरामध्ये हे एकमेव श्री साईंचे मंदीर आहे. दररोज तसेच दर गुरुवारी मंदीरामध्ये दर्शनासाठी गर्दी असते. मंदीरात प्रवेश करताच श्री साईंची मुर्ती पडते ती पाहताच मन प्रसन्न होते. मंदीरात शांत, प्रसन्न वातावरण कायमचे असते. साईंचे मंदीर सातारचे एक महत्वाचे मंदीर आहे.
 
गडकर आळी साताराचे ग्रामदैवत श्री पेढ्याचा भैरोबा सातारच्या पश्चिम बाजूकडील उंच दिसणा-या डोंगरावर मंदीर आहे. सदरचा डोंगर पेढ्याचा भैरोबा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून सातारा शहराचा परिसर विलोभनीय दिसतो. वार्षिक यात्रा काळात फक्त गडकर आळीच नव्हेतर सातारा शहरातील इतर भागातून नागरिक दर्शनासाठी येतातश्री पेढ्याचा भैरोबा देव कोनशीलावरील माहीतीनुसारश्री पेढ्याचा भैरवनाथ देव या मंदिराचे बांधकाम 1950 साली पूर्ण होवून सन 1958 साली शिखराचे काम पूर्ण झाले. दि. 19.12.1958 रोजी पुसेगांवचे प.पू. हनुमानगिरी महाराज यांचे शुभ हस्ते शिखरावर कळस बसविण्यात आला. 1977 साली मंडपाच्या कामास सुरुवात झाली. त्याचे भूमिपूजन श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे शुभ हस्ते करणेत आले. सन 1978 साली मंडपाचे काम पूर्ण होवून त्याचे उद्घाटन राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांचे शुभ हस्ते करणेत आले. सन 1996-97 साली मंदिराचा जिर्णोध्दार झाला.

 

 
करंजे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ हे साताराचे दैवत आहे. करंजे गावाला ऐतिहासीक संदर्भ आहे. श्री काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे. मंदीरामध्ये श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मुर्ती आहेत. मंदीराच्या परिसरात नगरपालिका शाळा क्र. 18 आहे. तसेच श्री विठ्ठल, श्री दत्तात्रय यांची मंदीरे आहेत. श्री काळभैरवाथ यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. जवळजवळ संपूर्ण सातारा या यात्रेत सहभागी होत असतो. पारगाव-तारगावच्या मानाच्या काठ्या, श्रींचा निघणारा छबीना, यात्रा काळातील संपूर्ण वातावरण वेगळेच असते. या यात्रेचे मोठे वैशिष्टय म्हणजे श्रींच्या छबीन्यानंतर जळत्या निखा-यावर चालण्याचा होणारा कार्यक्रम. नवसकर्ते पहाटे जळत्या निखा-यावरुन श्रींचे नावाचा उच्चार करीत चालून जातात. त्यांच्या पायाला काही इजा हात नाही. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सातारामध्ये करंजे आणि श्री काळभैरवनाथ मंदीर यांना अढळ स्थान आहे.
 
शाहुपूरी येथील श्री वैष्णवी माता मंदीराची प्राणप्रतिष्ठापना 10-10-2002 रोजी श्री. दामले गुरुजी यांच्या पौरोहीत्याखाली झाली. पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव वैष्णवी देवी मंदीर असावे. वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गाभा-यामध्ये जाताना पाय धुवून जाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. शांत, प्रसन्न वातावरणात गाभा-यात प्रवेश करताच वैष्णव देवीचे दर्शन होते. आतील वातावरण खुपच अल्हाददायक, शांत आणि मन प्रसन्ऩ करणारे आहे. मंदीरातून आल्यानंतरही देवीची मुर्तीची डोळ्यांसमोरुन हटत नाही. मंदीराच्या समोर भव्य असे श्री कैलास नारायण मंदीर आहे, त्याची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली आहे.
 
साताराचे ग्राम दैवत कुरणेश्वर आणि खिंडीतील श्रीगणेश सातारा बस स्टेशनपासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर जकातवाडी गावात आहे. हे मंदीर निसर्गरम्य परिसरामध्ये आहे. सभोताली गर्द झाडी, शांत प्रसन्न वातावरण परिसर आहे. हा परिसर कुरणेश्वर तसेच खिंडीतील गणपती या नावाने ओळखला जातो. या मंदीरातील गणेशाला ढोल्या गणपती असेही म्हटले जाते. हा गणेशा नवसाला पावणारा आहे अशी सातारकरांची श्रद्धा आहे. श्रीगणेशावर मोठी भक्ती आहे. गणेश मंदीराच्या मागील बाजूत श्री दत्तात्रयांचे मंदीर आहे. त्याच्या पुढील बाजूस श्रीकुरणेश्वराचे मंदीर आहे. या परिसरामध्ये कोठेही ध्यानस्त बसता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आत्ताच्या संगणक युगातदेखील दिपवालीमध्ये नरकचतुर्दशी दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करुन शकडो युवक-युवती, अबाल-वृद्ध श्रीगणेश आणि कुरणेश्वर यांचा आशिर्वाद घेतात. नंतरच दिपावली साजरी करतात. यामधून सातारकरांची या श्रद्धास्थळा विषयी असणारी भावना प्रकट करते. यातून सातारची संस्कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.
 
श्री स्वयंज्योति मूळे महाराज यांचे खाजगी श्री समर्थ नवग्रह मंदीर सन 1937 साली स्थापन झाले आहे. या मंदीरामूळे येथील परिसर समर्थ मंदीर म्हणून परिचीत आहे. मंदीराच्या छोटेखानी तळभागात सुर्य, चंद्र, मंगळ, राहू, शनी, गुरू, केतू, बुध, शुक्र या नवग्रहांची मंदीरे आहेत.
 
तामीलनाडू चिदंबरम येथील श्री नटराज मंदीरच्या धरतीवर 1985 मध्ये श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदीर सातारा येथे स्थापन करण्यात आले. श्री नटराज आणि देवी शिवकामसुंदरी तसेच इतर देवतांची पूजाआर्चा करण्यासाठी लाखो भक्त येत असतात. मंदीर परिसरामध्ये श्रीगणपती मंदीर, हनूमान मंदीर, राधा-कृष्ण मंदीर, शिवलिंग मंदीर, नवग्रह मंदीर, आद्य शंकराचार्य मंदीर, आय्याप्पा स्वामी मंदीर इत्यादी मंदीरे आहेत. महाराष्ट्रामध्ये केवळ सातारा येथे अशा प्रकारचे मंदीर आहे. या ठिकाणी वेदपाठशाळा चालविली जाते.
 
शुक्रवार पेठ येथील श्री कोटेश्वर मंदीर हे सातारकरांचे श्रद्धास्थान आहे. मंदीराची रचना प्राचीन पद्धतीची आहे. मंदीराच्या मागील बाजूस बालवाडीचे वर्ग घेतले जातात.
 
शुक्रवारपेठ येथील दक्षिणाभिमुखी सरपंच मारूती मंदीर
 
 
सातारा शहारातील सर्वात प्राचीन मंदीर आहे ते आहे श्री तुळजाभवानी माता मंदीर. सदरचे मंदीराची स्थापना 27-11-1603 मध्ये झाली आहे. मंदीराचे बांधकाम घरगुती स्वरूपाचे आहे, साता-यातील हे एकमेव अतीप्राचीन मंदीर असावे. मंदीरामध्ये श्री तुळजाभवानीचे दर्शन घेता मन प्रसन्न होते. सन 2014 मध्ये या मंदीराला 411 वर्ष होत आहेत. सदरचे मंदीर हे व्यंकटपूरा पेठ येथे, मंगळवार तळ्याचे मागील बाजूस स्थित आहे.
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या ---